Farmer Anudan : कोल्हापूर जिल्ह्यातील 14 हजार 800 शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे आदेश आज, सोमवारी (दि. 26) जारी करण्यात येणार आहेत. अशा स्थितीत अनेक दिवसांपासून तांत्रिक कारणामुळे रखडलेल्या प्रोत्साहनपर अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेला ४० कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या दोन्ही गोष्टी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर दिले होते. हे आश्वासन पूर्ण केल्याचेही मुश्रीफ म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार महाविकास आघाडीत अर्थमंत्री असताना त्यांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी ४५ कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी 5 कोटी रुपये प्राप्त झाले असून, 40 कोटी रुपये शिल्लक आहेत. या सरकारमध्ये पुन्हा अर्थमंत्री होताच त्यांनी 40 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करून ती रक्कम कोल्हापूर महापालिकेकडे पाठवली.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मागण्यांचा विचार केला जातो | Farmer Anudan
उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शेतकरी प्रोत्साहन अनुदान आणि अंबाबाई मंदिर विकास योजनेबाबत चर्चा झाली. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दोन्ही मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. उद्यापासूनच अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या मागण्या मान्य करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.