Krushi Bhavan : जिल्हा कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत एकाच छताखाली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बीड येथील पालवण रोड परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी भवन इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 90 लाख रुपयांच्या निधी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष पुढाकारामुळे हा निधी मंजूर झाला आहे.
बीडमधील पालवण रोडवरील कृषी विभागाच्या परिसरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि संबंधित आठ विभागांची अधिनस्त कार्यालये आहेत. उर्वरित कार्यालये शहरात इतरत्र आहेत. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत व योजनांची माहिती व पूरक समस्यांवर उपाय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी कृषी भवन बांधण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला होता.
फेब्रुवारी २०२२ च्या सुमारास हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्यात काय अडथळे येत आहेत, याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली. त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तांमार्फत पाठविलेल्या प्रस्तावाला बुधवारी (दि. 13) मंजुरी देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
त्यानुसार बीड जिल्हा कृषी भवनाच्या बांधकामासाठी 14 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केला असून कृषी भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही कृषी मंत्री कार्यालयाने दिली आहे.