Weather Update : राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. उन्हाचा तडाखा कमी होत असला तरी उष्णता मात्र कायम आहे. आज (दि. 18) मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (पिवळा इशारा) देण्यात आला आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
शुक्रवारी (ता. 17) सकाळपर्यंतच्या 24 तासांत जळगावात 42.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस झाला. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला असून कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत.
दक्षिणपूर्व राजस्थान आणि लगतच्या भागावर चक्री वारे वाहत असून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडूमध्ये समुद्रसपाटीपासून ५.८ किमी पर्यंत चक्रीवादळाची स्थिती आहे. तेथून छत्तीसगडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किमी उंचीवर चक्रीवादळ वारे वाहत आहेत.
अंदमानमध्ये दोन दिवसांत मान्सून | Weather Update
नैसर्गिक मान्सून वाऱ्यांच्या आगमनासाठी वातावरण अनुकूल झाले आहे. मान्सून उद्या (19) दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत देवभूमी केरळमध्ये 31 तारखेला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
वादळाचा इशारा (पिवळा इशारा):
नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.