Weather imd : शेतकऱ्यांना आतुरता असलेल्या मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. दोन दिवस एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर मॉन्सूनने आज काही भागात प्रगती केली. तर राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी उष्णता आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
गेले वर्षभर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या मॉन्सूनची आतुरता आहे. मॉन्सूनचा आतापर्यंतचा प्रवासही वेळेवर दिसतो आहे. मॉन्सूनने आज दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. तसेच मॉन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभगााने म्हटले आहे.
मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदामान आणि निकोबर बेटांचा उर्ववरित भाग, अंदमान समुद्राचा संपूर्ण भाग व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. दक्षिण केरळ भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे या भागात आणि शेजारच्या भागात पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागात पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईत काही ठिकाणी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली यासोबतच सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर तसेच सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शुक्रवारी आणि शनिवारीही काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.