Monsoon Rain : कोकणासह राज्याच्या दक्षिण भागांत गुरुवारी (ता. ६) मॉन्सूनच्या सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत पाऊस झाला. याशिवाय पुणे, नाशिक मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्यांच्या तयारीला वेग आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) मॉन्सून दाखल झाला असून मॉन्सूनच्या आनंदसरी सर्व जिल्ह्यांत सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागांत बुधवारी (ता. ५) मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गुरुवारी पहाटेपासून मॉन्सूनचे ढग जमा झाले. त्यानंतर मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यात दुपारनंतर वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला.
पुणे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दौंड, आंबेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी, निरगुडसर परिसरात ओढ्यांना पूर आला. दौंड तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडाक्यात मुसळधार पाऊस झाला.
सातारा जिल्ह्यात बुधवारी सातारा, महाबळेश्वर, खटाव, कन्हाड, वाई, पाटण तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणी साचले. वाई तालुक्यातील बावधन परिसरात पाऊस झाला. दरम्यान पसरणी येथे वीज पडून ३८ बकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे ओढ्याला आलेल्या पुरात काही लहान कोकरे वाहून गाळात रुतून मृत्युमुखी पडली. यामुळे जगन्नाथ श्रीपती कोळेकर (मूळ रा. नांदल, ता. फलटण, सध्या रा. पसरणी) या मेंढपाळांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी सायंकाळनंतर पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी जिल्ह्याच्या काही भागांत मॉन्सूनचाही पाऊस झाला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गुरुवारी (ता. ६) दुपारी मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. सोलापूर शहरासह पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, वैराग भागात हलका पाऊस झाला. याशिवाय विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा परिसरातही पाऊस झाला.
परभणी, हिंगोली, बीडमध्ये पाऊस
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४८ मंडलांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ मंडलांत, तर हिंगोली जिल्ह्यातील ९ मंडलांत हा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, बिलोली, नायगाव तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मॉन्सूनपूर्व पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.