Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला.
पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. दोडामार्गमध्ये सर्वाधिक 179 मिमी पाऊस झाला. या पावसामुळे पेरणी झालेल्या खरीप पिकांना संजीवनी मिळणार आहे. पेरणीलाही वेग येईल.
राज्यातील घाटमाथ्यावर कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (21) दमदार पाऊस झाला. चिपळूणमधील परशुराम घाटातील सुरक्षा भिंत कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याचे चिन्ह ओलांडल्याने किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर तालुक्यात शाळेचे छत व सुरक्षा भिंत कोसळली. मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. सिंधुदुर्गात गुरुवारी (दि. 20) दुपारी संततधार पाऊस झाला. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात हलका पाऊस सुरू आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत हलका पाऊस झाला. तर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. बावड्यात 89.1 मिमी पाऊस झाला. घाटमाथ्यावर भात रोपवाटिकेला आधार मिळाला आहे. मराठवाड्यात पेरणी वेगाने सुरू आहे. विदर्भातही पाऊस सक्रिय होत आहे. गुरुवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव येथे 57.5 मिमी, यवतमाळमधील बाभूळगाव येथे 48.5 मिमी, वर्ध्यातील समुद्रपूरमध्ये 54.2 मिमी आणि नेरमध्ये 47 मिमी पाऊस झाला.