Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत असून, राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे नद्या-नाले तुंबून वाहत आहेत.
शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत भंडाऱ्यांतील बारव्हा मंडलात ३४१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यांनाही पावसाने झोडपले आहे. विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने सर्वच भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे अनेकांच्या घरांत पाणी शिरले आहे. गोसी खुर्द, तोतलाडोह, ऊर्ध्व वर्धा या धरणांतील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पडला. भंडाऱ्यांसह उर्वरित जिल्ह्यातील अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.
नागपूरमधील तरोडी खुर्द येथील पंतप्रधान आवास योजनेतील वसाहतीत पावसाने हाहाकार केला. अनेकांच्या घरांना भेगा पडून त्यातून पाणी पाझरले. वर्ध्यात जोरदार पाऊस झाला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांत अनेक मंडलात अतिवृष्टी झाली. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अंबोणे या घाटमाथ्यांवर २०० मिलिमीटर तर, लोणावळा, शिरगाव, ठाकूरवाडी, दावडी, डुंगरवाडी, कोयना, खोपोली, ताम्हिणी, भीरा या घाटमाथ्यांवर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे १५ हुन कुटुंबांतील ६३ जणांचे स्थंलांतर करण्यात आले.
दक्षिण महाराष्ट्रात पुणे, साताऱ्यासह, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागांत मागील आठ दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने सर्वच नद्यांचे पाणी वाढू लागले आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी तर इतर ठिकाणी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे, पंचगंगा नदीचे पाणी शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले.
पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात पश्चिम परिसरात संततधार पाऊस व पूर्वेकडील भागात हलका पाऊस, तर शिराळा तालुक्यात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या.
मराठवाड्यात अनेक भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.
थोडक्यात महत्त्वाचे… Maharashtra Rain
राज्यातील १११ मंडलात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस
कोकणात सर्वत्र पावसाचा जोर कायम
सिंधुदुर्गात १५ हुन अधिक कुटुंबाचे स्थलांतर
खानदेश, मराठवाड्यात ढगाळ वातावरण
पूर्व विदर्भात सर्वच भागात अतिवृष्टीसदृश पाऊस
नागपूर, वर्धा जिल्ह्यांत शाळांना सुट्टी
पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूरमध्ये मुसळधार
पुणे, साताऱ्याच्या पश्चिम भागातही जोर
WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.