Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीड वर्षानंतर 232 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने उर्वरित रक्कम देण्याचे मान्य केले आहे.
2022 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला. मात्र, भारतीय कृषी विमा कंपनीने केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 50 टक्के रक्कम दिली.
या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते शेतकरी अनिल जगताप यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कंपनीवर आरआरसी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या कारवाईच्या भीतीने कंपनीला उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देणे भाग पडले.
ही रक्कम 25 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी सांगितले.