
MGNREGA Wages : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्रात प्रतिदिन २९७ रुपये मजुरी देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत बागेतील कामासाठी शेतकऱ्यांना प्रतिदिन २४ रुपये अधिक मिळणार आहेत.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने बुधवारी (ता. 27) अधिसूचना जारी करून देशातील नवे वेतन दर जाहीर केले. आता हरियाणामध्ये रोजगार हमीवरील कामासाठी सर्वाधिक वेतन दर 374 रुपये प्रतिदिन आहे. सर्वात कमी दर पंजाबचा आहे जो प्रतिदिन 222 रुपये आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव अमित कटारिया यांनी पत्रात म्हटले आहे की, नवे दर १ एप्रिलपासून दिले जातील. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांना लक्षात घेऊन ‘रोहयो’ची नवीन मजुरी गुजरातसाठी 280 रुपये, कर्नाटकसाठी 349 रुपये, मध्य प्रदेशसाठी 243 रुपये, तेलंगणासाठी 300 रुपये आणि गोव्यासाठी 356 रुपये प्रतिदिन असेल.
यावेळी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोटे म्हणाले की, केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन बागा लावण्यास प्रोत्साहन मिळेल. 1 एप्रिलपासून बागांमधील सर्व अकुशल कामांच्या मजुरीमध्ये प्रतिदिन 24 रुपयांनी वाढ होणार आहे. सध्या 273 रुपये प्रतिदिन मजुरी दराने बिल दिले जात आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्यास राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन बागा लावण्याचे काम सुमारे 60 हजार हेक्टरवर होऊ शकते. चालू हंगामात लागवडीचे उद्दिष्ट ५५ हजार हेक्टर होते; पावसाने साथ दिल्यास ६० हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकते, असा अंदाज उद्यान विभागाचा आहे.
आपला बळीराजा ; Whatsapp Group वर सामील होऊ शकतात.


