Onion Smuggling : कांद्याच्या निर्यातीवरील बंदीमुळे शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होत आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून उत्पादन खर्चही निघत नाही. नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लादून दोन महिने उलटले आहेत. निर्यातबंदीच्या निर्णयाने सरकार शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नसून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. मात्र, निर्यातबंदीमुळे अनेक देशांमध्ये कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता भारतातून कांद्याची तस्करी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
कांद्यावर निर्यातबंदी असल्याने टोमॅटोच्या कंटेनरमध्ये कांद्याची तस्करी होत आहे. टोमॅटोच्या नावाखाली कांद्याची तस्करी झाल्याची अशीच एक घटना समोर आली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये ८२.९३ टन कांदा यूएईला पाठवला जात असल्याची गोपनीय माहिती सीमाशुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोच्या कंटेनरमध्ये कांदा विदेशात पाठवला जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्याअंतर्गत हा कांदा जप्त करून कारवाई करण्यात आली.
नाशिकमधील दोन निर्यातदार टोमॅटोच्या पेटीच्या मागे कंटेनरमध्ये भरून कांदा यूएईला पाठवण्याच्या तयारीत होते. मात्र, सीमाशुल्क विभागाच्या नागपूर युनिटने मुंबईतील कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या पुढील बाजूस टोमॅटोचा बॉक्स आणि मागील बाजूस कांद्याची पोती लपविल्याचे आढळून आले.
दरम्यान, निर्यातबंदीमुळे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला परवडणारे भाव मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका आणि आखाती देशांमध्ये कांद्याच्या तस्करीच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांकडून महागड्या भावाने खरेदी करून कांद्याची विदेशात तस्करी होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.