Rain Alert : यंदा मान्सूनवर ‘ला निना’चा प्रभाव असल्याने समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. दरम्यान यंदाच्या पावसाच्या हंगामात मध्य भारत आणि दक्षिण द्विपकल्पीय भारतात पावसाचे प्रमाण सर्वसामान्यपेक्षा अधिक असणार आहे. जून महिन्यात राज्यात अधिक पावसाची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. याचा बळीराजाला देखील चांगलाच फायदा होणार आहे असे होसाळीकर म्हणाले.
तर दुबार पेरणीचे संकट
सध्या मॉन्सून पूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस काही ठिकाणी जोरदार होत आहे. परंतु हा पाऊस पुढच्या काही दिवसात थांबू शकतो यानंतर जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्यास पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. यामुळे १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. तसेच कमी पावसात पेरणी केल्यास शेतीत किडीचा जोरदार प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
मॉन्सूनने महाराष्ट्रासोबतच दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि किनारी आंध्र प्रदेशातील आणखी काही भागात प्रगती केली. मॉन्सूनची सिमा आज हर्णे, बारामती, निजामाबाद, सुकमा, मलकणगिरी, विजयानगरम आणि इस्मालपूर या भागात होती.
मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे मॉन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुंबईसह आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच तेलंगणाचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राचा उर्वरित भाग मॉन्सून व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
राज्यातील पुढील ४ ही दिवस बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. हवामान विभागाने आज राज्यभारात पावसाचा येलो अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर उद्या राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाचा अनेक ठिकाणी अंदाज असून सिंधुदूर्गात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला.
तसेच रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. सोमवारी आणि मंगळवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तसेच राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.