Weather Forecast : पावसासाठी अनुकूल हवामानामुळे राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण आहे. ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात किंचित घट दिसून आली आहे. आज (ता. 9) विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज | Weather Forecast
मराठवाडा आणि परिसरात समुद्रसपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्री वाऱ्याची स्थिती आहे. तर आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापासून रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
विदर्भासह संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. विदर्भात कमाल तापमान चाळीशीच्या खाली गेले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदले गेले. सोमवारी (ता. 8) सकाळपर्यंतच्या 24 तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वादळी पावसासाठी अनुकूल हवामानामुळे विदर्भ, मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमी-अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश राहण्याची शक्यता आहे.
वादळाचा इशारा (पिवळा इशारा):
धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.