Weather Update : गेल्या पाच दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. हवामान खात्याने आज विदर्भातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
आज विदर्भातील सहा जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला.
या जिल्ह्यांतील इतर भागातही ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.
बहुतांश भागात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे. येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा कमाल आणि किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.